शेतकरी, बेरोजगार युवक व घरकुल वंचितांच्या प्रश्‍नावर राहुल गांधी यांच्याकडे आग्रह


महाराष्ट्रात सराकार आणण्यासाठी धोरण जाहीर करण्याची मागणी
लोकभज्ञाक चळवळीचा पुढाकार
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील येत्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर लोकभज्ञाक चळवळीचे कार्यकर्ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्याकडे शेतकरी, बेरोजगार युवक व घरकुल वंचितांचे प्रश्‍न सोडविण्याची मागणी करुन विविध प्रकल्प राबविण्याची मागणी करणार आहे. महाराष्ट्रातील दोन कोटी जिरायतदार अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी धनराई जलकर्णिका, ठिबक सिंचन हंगामी बागायती करण्यासाठी आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना दारिद्य्राच्या खाईतून आणि आत्महत्येच्या छायेतून बाहेर काढण्यासाठी कृषीभज्ञाक कार्यक्रम राबविण्यासंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
आधुनिक तंत्रज्ञानाने फार मोठी प्रगती केली आहे. प्रत्येक पाच एकर जिरायती जमिनीमध्ये 20 फूट लांब 15 फूट रुंद आणि 15 फूट खोल खड्डा खोदून त्यामध्ये दगड गोटे टाकून शेतामध्ये उताराच्या बाजूलाही जलकर्णिका करण्याचा प्रस्ताव आहे. जलसंधारण तंत्रातील शंभर टक्के यशस्वी होणारी जलकर्णिका योजना आहे. त्यामुळे त्या शेतातील दरवर्षी किमान 20 ते 30 लाख लिटर पावसाचे पाणी जमिनीमध्ये मुरवले जाऊ शकणार आहे. त्यातून त्या जमिनीसह शेजारच्या जमिनीचा भूगर्भाची जळपातळी वाढणार आहे. तर ठिबक सिंचनने हंगामी बागायतदार शेतकरी उभे राहू शकणार आहेत. त्याचबरोबर जलकर्णिकाच्या शेजारी आंबा, चिंच, सिताफळ, आवळा, बोर इत्यादी फलझाडांची धनराई या जमिनीत जलकर्णीकेच्या भोवती उभी करता येणार आहे. भर उन्हाळ्यात देखील या फळझाडांना सिंचन पाणी मिळाले नाही, तरी त्यावर विपरीत परिणाम होणार नाही. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक हंगामी बागायतदार बनविता येणार असून, काँग्रेस पक्षाने याबाबत क्रांतिकारक भूमिका घेऊन 2 कोटी शेतकरी, शेतमजुरांना दारिद्य्राच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी आश्‍वासन दिल्यास काँग्रेस आणि मित्र पक्षाचे सरकार महाराष्ट्रात आणणे सोपे होणार असल्याची भूमिका संघटनेच्या वतीने मांडण्यात आली आहे.
प्रत्येक शहराच्या सीमे बाहेर लॅण्ड व्हॅल्यू कॅप्चर योजनेद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात 50 लाख घरकुल वंचितांना भूमि गुंठा देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली पाहिजे. सरकारी तिजोरीवर बोजा न पडता जमीन मालक शेतकऱ्यांना देखील बाजारभावाचे दुप्पट किंमत मिळेल आणि घरकुल वंचितांना अल्प किमतीत म्हणजे फक्त 50 हजार रुपयात भूमीगुंठा मिळू शकणार आहे. त्याचबरोबर राज्यातील 50 लाख बेरोजगार लोकांना स्वयंरोजगारची हमी या योजनेअंतर्गत मिळणार आहे. काँग्रेस पक्षाचे सरकार राज्यात आणून एक गुंठा अल्प किमतीत देण्याची तयारी दाखवून महाराष्ट्रातील शेतकरी, बेरोजगार युवकांचा व घरकुल वंचितांचा प्रश्‍न सोडविण्याची आग्रही मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
भाजपने धर्म, देव, उंबऱ्याच्या बाहेर आणले आणि त्याचा बाजार मांडला. त्याचबरोबर लोकांची दिशाभुल करुन गेल्या लोकसभा निवडणुकीत चारशे पारची घोषणा केली. परंतु भारतातील मतदारांनी मध्यमवर्ग वापरून पंतप्रधान मोदी यांच्या झोळीत बहुमत टाकले नाही. महाराष्ट्रात भाजपचे आणि त्यांच्या मित्र पक्षाचे सरकार येण्याचे अजिबात शक्यता नाही. या परिस्थिती ओळखून काँग्रेस व त्यांच्या मित्र पक्षाच्या महाविकास आघाडीने घरकुल वंचित, बेरोजगार व शेतकरी यांच्या कल्याणासाठी भूमिका जाहीर केल्यास महाराष्ट्रात काँग्रेसचे मुख्यमंत्री असलेले सरकार नक्कीच येऊ शकणार असल्याचे ॲड. गवळी यांनी म्हंटले आहे. या मागणीसाठी ॲड. गवळी, संजय बारस्कर, अशोक सब्बन, ओम कदम, प्रकाश थोरात, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.

news portal development company in india
marketmystique