ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना मानवंदना देऊन ग्लोबल वार फुटींग प्लांटेशन कार्यक्रम जारी

लोकभज्ञाक चळवळीच्या वतीने ग्लोबल वॉर्मिंग विरुद्ध संपूर्ण भारत भर लढा      ॲड. कारभारी गवळी

अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्लोबल वॉर्मिंग प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या लोकभज्ञाक चळवळीच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना मानवंदना देऊन ग्लोबल वॉर फुटींग प्लांटेशन कार्यक्रम जारी केला आहे. जनतेच्या सहभागातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून ते जोपासण्यासाठी या कार्यक्रमाद्वारे प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
औद्योगिक क्रांतीनंतर निसर्गाची फार मोठी लूट सुरू झाली. अनेक देश श्रीमंत झाले आणि लक्षावधी लोक श्रीमंतांच्या यादीत जाऊन बसले. परंतु त्याच वेळेला ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्‍न निर्माण झाला आणि वाढत गेला. त्याचबरोबर भारतासह जगभरातील 70 टक्के लोक गरीबीच्या खाईत ढकलले गेले. ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्‍न आणि जगभरातील गरीबीचा प्रश्‍न एकमेकांशी संबंधित आहे. या चळवळीच्या माध्यमातून येत्या पाच वर्षात दोन्ही प्रश्‍न सोडविण्यास यश येणार असल्याचा विश्‍वास व्यक्त करण्यात आला आहे.
भारतात जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय निसर्गपाल यासाठी संपूर्ण देश प्रयत्नशील आहे. त्यामुळे लोकभज्ञाक चळवळीने निसर्गभज्ञाक यशस्वी करण्यासाठी कृषीभज्ञाक चळवळ जारी केली आहे. कृषी बाबतची भक्ती, कृषी तंत्रज्ञानाचा अभ्यास आणि त्याचबरोबर संपूर्ण भारतभर एकात्मिक हरितक्रांती राबवण्यासाठी कृषीभज्ञाक चळवळ संघटनेने घोषित केली आहे.
भारतात आजही पिढ्यान पिढ्या एकाच प्रकारची पारंपारिक पद्धतीने शेती केली जाते. आधुनिक तंत्रज्ञानात, शेती प्रधान असलेला आपला देश मागे आहे. सध्या शेती करणाऱ्या मुलाला मुलगी देण्यासही कोणी तयार होत नाही. त्यातून देशभरात लाखोंच्या संख्येने शेतकऱ्यांचे मुले अविवाहित राहिली आहेत. शेतकऱ्यांचा विकास साधण्यासाठी सर्वच बाबतीत कृषीभज्ञाक तंत्राच्या वापरामुळे क्रांती होणार आहे. जय किसान यशस्वी करण्यासाठी देशभरातील शेतकऱ्यांच्या मदतीने अन्न, पाणी, हवा, जैवविविधता त्याशिवाय निसर्ग संरक्षण या सर्व गोष्टी यशस्वी करता येतील. खाण्यापिण्याच्या पद्धतीमुळे व रासायनिक खतांच्या वापरामुळे अनेक आजार सर्वत्र सुरू आहेत. निसर्गाच्या तंत्राप्रमाणे जीवन प्रणाली स्वीकारल्याशिवाय मानव जातीला सुखाचा लाभ होऊ शकणार नाही. त्याचबरोबर इतर सजीवांच्या अधिकारांवर येणारे अतिक्रमण संपविण्याची जबाबदारी संपूर्ण मानव जातीवर येऊन पडलेली आहे. यापूर्वी हरितक्रांती यशस्वी झाली, परंतु यापुढे एकात्मिक हरितक्रांतीसाठीच्या प्रयत्नांची गरज असल्याचे संघटनेच्या वतीने म्हंटले आहे.

लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती या संदर्भात भारतामध्ये पाच हजार वर्षे भारतीय मानसशास्त्र आणि तत्वज्ञान विकसित झाले आहे. त्याच्या आधारे पर्यावरणाचे प्रश्‍न देखील नक्कीच सोडविता येऊ शकणार आहेत. निसर्गाला शरण जाणे आणि इतर मानवांची व सजीवांची सेवा करणे त्यांच्या हक्कावर गदा न आणता आपला जीवनक्रम चालू ठेवणे यामध्ये मानवी संपन्नता सिद्ध असल्याचे संघटनेने जाहीर केले आहे. अण्णा हजारे यांनी लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च केले. त्यामुळे त्यांच्याबद्दल सर्वांना नक्कीच आदर असून, त्यांना मानवंदना देण्यासाठी संघटनेने व्यापक स्वरूपात कृषीभज्ञाक चळवळ सुरू केली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या चळवळीसाठी ॲड. कारभारी गवळी, संजय बारस्कर, अशोक सब्बन, ओम कदम, प्रकाश थोरात, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.

news portal development company in india
marketmystique