नागरिकांना आजीवन निसर्गपाल तर मुला-मुलींना बाल निसर्गपाल म्हणून मान्यता देणार – उप आयुक्त. विजय कुमार मुंढे

  लोकभज्ञाक चळवळीच्या वतीने आयुक्त पंकज जावळे यांचा “महानगर निसर्गपाल “म्हणून सन्मान!

वृक्षरोपणासाठी महापालिका शहरात हरित पट्टे आखून देणार
महापालिका, निसर्गप्रेमी संघटना व लोकभज्ञाक चळवळीच्या संयुक्त बैठकीत निर्णय
नागरिकांना आजीवन निसर्गपाल तर मुला-मुलींना बाल निसर्गपाल म्हणून देणार मान्यता
अहमदनगर (प्रकाश थोरात )- पर्यावरणाचे प्रश्‍न सोडविण्यासह शहर हरित करण्याच्या दृष्टीकोनाने महापालिका प्रशासन, निसर्गप्रेमी संघटना व लोकभज्ञाक चळवळीच्या प्रतिनिधींची महापालिकेत बैठक पार पडली. उपायुक्त विजयकुमार मुढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मनपाच्या माध्यमातून शहरात रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यासाठी व वसाहतीमध्ये वृक्षरोपणासाठी हरित पट्टे आखून देण्याचा व 20 हजार नागरिकांना आजीवन निसर्गपाल तर 5 हजार मुला-मुलींना बाल निसर्गपाल म्हणून मान्यता देण्याचे कबुल करण्यात आले.
लोकभज्ञाक चळवळीच्या वतीने महापालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांना महानगर निसर्गपाल म्हणून सन्मानित करण्यात आले. जावळे यांनी सुद्धा आजीवन निसर्गपाल म्हणून काम करून पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. या बैठकीसाठी ॲड. कारभारी गवळी, प्रकाश थोरात, वीर बहादुर प्रजापती, अशोक भोसले, संजय मंडलिक, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, अमित थोरात, बाबासाहेब धीवर, अशोक कुलकर्णी, प्रल्हाद देशपांडे, डॉ. रमाकांत मरकड, मीराबाई सरोदे, नामदेव अडागळे, संजय बारस्कर, दत्तात्रय उरमुडे, नानासाहेब उरमुडे, महापालिकेचे उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजन, मनसुख गांधी, ए.वाय.नरोटे आदी उपस्थित होते.
शहरात 2 हजार नॅनो धनराईला मान्यता देऊन आणि नव्याने मोठ्या प्रमाणात धनराई होण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. शहराच्या रस्त्यांच्या कडेला झाडांना पाणी देण्यासाठी वृक्ष सिंचन निसर्गदान योजना राबविण्याचा प्रस्ताव यावेळी मांडण्यात आला. प्रदूषणावर व पर्यावरणाच्या प्रश्‍नावर नियंत्रण मिळविण्यासाठी वृक्षरोपणाशिवाय पर्याय नसून, झालेल्या बैठकीत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून ते जगविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचा संकल्प करण्यात आला. नागरिकांना निसर्ग भज्ञाक जीवन प्रणाली स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सीना नदीच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वड, पिंपळाची झाडे लावण्याचा निर्णय यावेळी करण्यात आला. उपायुक्त विजयकुमार मुंढे यांनी या बैठकीतील निर्णयामुळे शहरात पर्यावरणाची क्रांतिकारक लोकचळवळ बहरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली. तर निसर्गपाल आणि बालनिसर्गपाल यांनी पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या कामाबद्दल महापालिका प्रमाणपत्र देणार असल्याचेही कबुल केले. अशोक कुलकर्णी यांनी त्यांच्या गुंजन सोसायटीत स्वतःच्या खर्चाने झाडे लावून, ठिबक सिंचन पद्धती राबवण्याची घोषणा केली.
या बैठकीत जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय निसर्गपाल अशा क्रांतिकारी घोषणेला मान्यता देण्यात आली. संत ज्ञानेश्‍वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांना विश्‍वनिसर्गपाल म्हणून मानवंदना देण्यात आली. उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजन यांनी काही दिवसातच वृक्षरोपणासाठी व्यापक कार्यक्रम हाती घेऊन त्यासाठी शहरातील सर्व निसर्गप्रेमी कार्यकर्त्यांची बैठक पुन्हा घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

news portal development company in india
marketmystique